नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- तारण ठेवलेले सोने वर्ग करण्याचे सांगून सोने न देता पावणे आठ लाख रुपये परस्पर घेऊन आयआयएफएल फायनान्स कंपनीची फसवणूक केल्याची घटना त्रिमूर्ती चौक परिसरात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आरोपी राकेश विलास गाडे (वय 38) व तुषार विलास गाडे (दोघे रा. फ्लॅट नं. 303, डी विंग, तिरुमला ओमकार रेसिडेन्सी, पाईपलाईनरोड, सातपूर, नाशिक) यांनी कॅप्रिग्लोबल कॅपिटल लिमिटेडकडे सोने तारण ठेवले होते. त्यांनी कर्जाची परतफेड न केल्याने या सोन्याचा लिलाव होणार होता. दरम्यान राकेश गाडेने आयआयएफएल फायनान्स कंपनीकडे जात मी कॅप्रिग्लोबल लिमिटेडमधून सोने सोडवून तुमच्याकडे सोने गहाण ठेवतो, तुम्ही मला पैसे द्या, असे सांगितले.
त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आयआयएफएलने कॅप्रिग्लोबल कॅपिटल लिमिटेडचे कर्ज भरण्यासाठी त्याच्या खात्यात 7 लाख 71 हजार 631 रुपये वर्ग केले. परंतू गाडेने ही रक्कम कॅप्रिग्लोबल लिमिटेडच्या खात्यावर न भरता दुसर्या खात्यावर वर्ग करुन घेतली. गहाण ठेवलेले सोने घेण्यासाठी आयआयएफएलचे कर्मचारी तासभर थांबले असता त्यांना समजले की गाडेने ही रक्कम कॅप्रिग्लोबल कॅपिटल लिमिटेडकडे भरलेली नाही.
आरोपींनी आयआयएफएल-कडून सोनेतारण कर्ज घेतले परंतू सोने न देता त्यांची फसवणूक केली. आयआयएफएलच्या ब्रांच मॅनेजर धनश्री राऊत यांनी आरोपींविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी राकेश गाडे याला अटक केली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप गिरी करीत आहेत.