नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- सावकार निबंधक यांनी रीतसर नोटीस देऊन एकाच्या घराची झडती घेतली असता सदर इसम अवैध सावकारी करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी, की पंचवटीतील तारवालानगर येथील वैभवलक्ष्मी अपार्टमेंटच्या फ्लॅट नंबर 10 मध्ये राहणारे कल्याणी चंद्रकांत भोईर हे अवैध सावकारी करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्र सावकारी अधिनियम (नियमन) अधिनियम 2014 मधील कलम 16 आणि 17 नुसार दि. 5 ऑगस्ट 2025 रोजी सावकारी निबंधक यांनी पोलीस बंदोबस्तासह भोईर यांना नोटीस बजावली.
त्यांच्या राहत्या घराची झडती घेतली असताना त्यांच्या घरात अवैध सावकारीच्या संबंधाने कागदपत्रे आणि दस्तऐवज आढळून आले. या पथकाच्या प्रमुखांनी पंचनामा करून अहवाल सादर केल्यानंतर सावकाराचे निबंधक तथा उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक तालुका यांनी अर्जदार व गैरअर्जदार यांची सुनावणी घेतली.
त्यात भोईर हे अवैधरीत्या सावकारी करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने या कार्यालयाच्या दि. 15 ऑक्टोबर 2025 च्या पत्रान्वये भोईर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 23, 39, 42 व 45 नुसार पंचवटी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार संतोष कोरडे पुढील तपास करीत आहेत.