दैनिक भ्रमर : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ठिकठिकाणी तयारी पूर्ण झाली असून, नाशिकच्या द्वारका परिसरातील इस्कॉन मंदिरातही मोठ्या उत्साहात आणि आनंदात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. भाविकांना दर्शनासाठी मंदिरे दिवसभर खुली राहणार असून, शुक्रवारी रात्री पारंपरिक पद्धतीने श्रीकृष्ण जन्मसोहळा साजरा करण्यात येईल.
फुलांची सजावट, विद्युतरोषणाई अन् पारंपरिक पद्धतीने श्रीकृष्ण जन्मसोहळा असे भक्तिपूर्ण वातावरण आज मंदिरांमध्ये पाहायला मिळणार आहे. शनिवारी गोपाळकालाच्या निमित्तानेही मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीकृष्ण जन्माष्टमी मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.
मंडळे दहीहंडीसाठी सज्ज
गोपाळकालानिमित्त ठिकठिकाणी संस्था-संघटना, राजकीय पक्ष आणि मंडळांकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. शनिवारच्या या उत्सवाची तयारीही जोमाने सुरू आहे. विविध गीतांच्या तालावर ठेका धरून तरुणाई उत्सवात सहभागी होणार असून, गोविंदा मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडणार आहेत. तर काही संस्थांकडून विशेष मुले, दिव्यांग मुले, अनाथ मुलांसोबत दहीहंडी साजरी केली जाणार आहे.