चिन्मय कृष्णा दास ब्रह्मचारी या हिंदू नेत्याला सोमवारी झालेली अटक आणि त्यापाठोपाठचा तुरुंगवास यामुळे भारताकडून अधिकृतरीत्या चिंता व्यक्त करण्यात आली असतानाच, चिन्मय दास यांच्या कारवायांशी इस्कॉनचा काहीही संबंध नाही असा खुलासा ‘इस्कॉन बांगलादेश’चे सरचिटणीस चारू चंद्र दास ब्रह्मचारी यांनी केला आहे.
बांगलादेशच्या उच्च न्यायालयाने ‘इस्कॉन बांगलादेश’वर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळल्यानंतर चारू दास यांनी यासंबंधी आपली भूमिका स्पष्ट केली. चिन्मय दास यांची कृत्ये आमच्या संघटनेचे प्रतिनिधित्व करत नाहीत, असे सांगत चारू दास यांनी चिन्मय दास यांच्यापासून अंतर राखले.
चिन्मय दास यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई म्हणून त्यांना यापूर्वीच संघटनेच्या सर्व पदांवरून काढून टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या कृतींमध्ये इस्कॉनचा सहभाग नसतो असे चारू दास म्हणाले.
बांगलादेशात या आठवड्यात घडलेल्या हिंसक कारवायांशी इस्कॉनचा संबंध नाही, असेही चारू दास यांनी स्पष्ट केले. इस्कॉन बांगलादेश कधीही धर्मांध किंवा संघर्षावर आधारित कृत्यांमध्ये सहभागी नव्हता आणि आम्ही केवळ ऐक्य व सलोख्याचा प्रचार करतो असे ते म्हणाले.