नाशिक : नाशिकच्या ओझर विमानतळावर आंतरराष्ट्रीय सेवा सुरू व्हाव्यात यासाठी मागील वर्षभरापासून प्रयत्नशील असलेले नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी पुन्हा एकदा मंगळवारी (दि. २२जुलै) लोकसभेत थेट प्रश्न विचारत केंद्र सरकारला विचारणा केली आहे. मात्र केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा अपेक्षाभंग करणारे उत्तर देण्यात आल्याने नाशिककरांच्या आशा पुन्हा मावळल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
लोकसभेत खासदार वाजे यांनी गृह मंत्रालयाला पाच स्पष्ट प्रश्न विचारले. ओझर विमानतळावर इमिग्रेशन तपासणी केंद्र सुरू करण्याबाबत सरकारने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ला मंजुरी दिली आहे का? इमिग्रेशन ब्युरोने आवश्यक सुविधांची पूर्तता झाल्याचे मान्य केले आहे का? आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी प्रणाली आणि कर्मचारी नियुक्तीचा प्रस्ताव आहे का? ही सुविधा सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी सुरू होणार आहे का? आणि या संदर्भात आंतर-मंत्रालयीन समन्वयासाठी कोणती पावले उचलली जात आहेत? असे थेट प्रश्न उपस्थित केले.
मात्र, गृहमंत्रालयाकडून मिळालेल्या उत्तरात, ओझर विमानतळाची सध्या आंतरराष्ट्रीय नियोजित प्रवासी सेवेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा अपुरी असल्याचे नमूद करत केवळ कार्गो व चार्टर्ड फ्लाइटच्या तपासणीसाठीच सध्या ती जागा उपयोगी असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय, काही पोलिस अधिकाऱ्यांना इमिग्रेशन प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले असल्याची माहिती देण्यात आली; मात्र नियमित आंतरराष्ट्रीय सेवा सुरू होण्याबाबत कुठलीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही.
खासदार राजाभाऊ वाजे यांनी या मुद्द्यावर गेल्या वर्षभरात नागरी उड्डाण मंत्रालय, गृह मंत्रालय व पर्यटन मंत्रालयाशी सातत्याने पत्रव्यवहार केला असून अनेक अधिकाऱ्यांच्या भेटीद्वारे विषयाला गती देण्याचा प्रयत्न केला आहे. नाशिकमधील वाढती लोकसंख्या, उद्योग, शिक्षण आणि धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय सेवा सुरू होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांचे मत आहे.
२०२७ मध्ये येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, ही सेवा सुरू झाली तर लाखो देशी-विदेशी भाविकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. मात्र केंद्र सरकारच्या उत्तरांवरून अद्यापही या विषयाकडे गंभीरतेने पाहिले जात नसल्याचेच दिसून येत आहे. नाशिकच्या संभाव्य प्रगतीला चालना देणाऱ्या या निर्णयाकडे आता नाशिककरांचे लक्ष लागले आहे. विशेषतः आगामी काळात केंद्र सरकार याबाबत ठोस निर्णय घेते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
“ओझर विमानतळावर आंतरराष्ट्रीय सेवा सुरू होणे ही नाशिककरांची मागणी नाही, तर हक्काची बाब आहे. केंद्र सरकारने या विषयाकडे केवळ कागदोपत्री न पाहता प्रत्यक्ष कृती करावी,” असे स्पष्ट शब्दांत राजाभाऊ वाजे यांनी सांगितले.
नाशिक हे उद्योग, अध्यात्म, व्यापार, कृषी, पर्यटन या सर्वच बाबतीत महत्वाचं केंद्र आहे. नाशिकमध्ये आंतराष्ट्रीय हवाई सेवा सुरू झाल्यास हजारो प्रवाश्यांना त्याचा फायदा तर होईलच परंतु देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. यासह मुंबई वरील अधिकचा भार देखील कमी होऊ शकेल यासाठी ओझर विमानतळावर आंतराष्ट्रीय विमानसेवा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न आहे.
राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक