नाशिक : मतदान केंद्राबाहेर भगवे वस्त्र परिधान केल्याने पोलिसांनी शांतीगिरी महाराज यांचे सहकारी जनेश्वर महाराज यांना ताब्यात घेतले होते. काही वेळानंतर त्यांची पोलिसांनी सुटका केली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे जय बाबाजी भक्त परिवारातील सदस्य संतप्त झाले होते.
या प्रकरणी बोलताना शांतीगिरी महाराजांचे प्रवक्ते विष्णू महाराज यांनी सांगितले, की भगवे कपडे हा साधू-संतांचा पेहराव आहे. त्यामुळेच जनेश्वर महाराजांनी हे कपडे परिधान केले होते. या कपड्यांवर उमेदवाराचे नाव, निशाणी काहीच नव्हते.
तरीही पोलिसांनी केलेली कारवाई ही एक प्रकारे दडपशाही असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मतदान केंद्रांवर भगवे कपडे परिधान करू नयेत, असा कोणताही लेखी आदेश नसल्याचेही त्यांनी सांगितले.