ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण केले. पाच दिवस चाललेल्या या उपोषणांनंतर अखेर जरांगे पाटील यांच्या उपोषणाला यश येत सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या. २ सप्टेंबर रोजी देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियरचा जीआर काढला होता. त्यानंतर आता कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे.
हैद्राबाद गॅझेटिअर मधील नोंदी विचारात घेऊन गावपातळीवर गठीत समितीमधील सदस्यांसाठी प्रशिक्षण सत्र व कार्यशाळा आयोजित करण्याच्या मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे पत्र समोर आले आहे. मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून हैद्राबाद गॅझेटिअरच्या नोंदींवर आधारित तपासणी सुरू झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशीव, लातूर, हिंगोली, बीड, नांदेड आणि परभणी जिल्ह्याला राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून पत्र पाठवण्यात आले आहे. हैद्राबाद गॅझेटिअर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गावपातळीवर समिती गठीत केली आहे.