मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठावाडा दौरा सुरु केला आहे. हिंगोली जिल्ह्यातून त्यांनी मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीची सुरुवात केली आहे. मराठा बाहेर पडल्याशिवाय न्याय मिळणार नाही, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला मोठ्या संख्येने रॅलीत सामील होण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे मोठ्या संख्येने मराठा समाजाने हजेरी लावली आहे.
ओबीसीतून आरक्षण दिलं नाही तर सरकारला माझा १३ तारखेचा निर्णय झेपणार नाही, त्यामुळे सरकारने आता शहाणपणाची भूमिका घ्यावी, असा इशारा देत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देण्याची मागणी केली आहे. तर जरांगे पाटील अजूनही सगेसोयऱ्यांच्या मागणीवर ठाम आहेत.
'आम्ही सरकारवर विश्वास टाकला आहे. सगेसोयऱ्याच्या अंमलबजावणीसोबतच आमच्या मागण्या सरकारला पूर्ण कराव्याच लागणार आहेत. अन्यथा आणखी मोठा जनसमुदाय एकत्र येईल.' असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. हिंगोलीपासून सुरु झालेली मराठा समाजाची ही शांतता रॅली पाच टप्प्यांत असणार आहे, पहिल्या टप्प्यात मराठवाडा हा मराठ्यांच्या वादळाने व्यापला जाणार आहे. तर पुढे राज्याच्या अन्य भागांत ही रॅली पोहोचणार आहे.