ओबीसी प्रवर्गातून आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनासाठी राज्यभरातून मराठा बांधव मोठ्या संख्येने आले आहे. ओबीसीतुन आरक्षणासाठी मात्र ओबीसी नेते विरोध करताना दिसून येत आहे. या आंदोलनाचा फटका मात्र मुंबईला बसला आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, जरांगेंनी पुन्हा आंदोलनासाठी परवानगी मागितली आहे. कायद्याच्या चौकटीत राहून जी काही उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार पोलिस त्यांना सहकार्य करतील. प्रशासन सकारात्मक विचार करेल. शेवटी या आंदोलनात त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांसंदर्भात जो मार्ग काढता येईल तो काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी एक समिती आहे. या समितीला आधी आलेल्या मागण्यावर ते विचार करत आहेत. कायदेशीर मार्ग काढावे लागतील. नुसते आश्वासन देऊन चालणार नाही.
सरकार मराठा समाजाच्या पाठिशी आहे असं म्हणत फडणवीसांनी सांगितले की, 'महायुतीच्या काळातच मराठा समाजाला न्याय मिळाला आहे. इतर काळात त्यांना न्याय मिळाला नाही. आरक्षणाचे, सारथीचे कामही आम्हीच करून दिले आहे. विद्यार्थ्यांना परदेशात पाठवण्याचे कामही आम्हीच केले आहेत. शिक्षणाच्या, रोजगाराच्या गोष्टी आमच्या सरकारच्या काळात केल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाबद्दल आम्ही सकारात्मकच आहोत. कुठल्याही प्रकारे मराठा समजाजबद्दल आमच्या मनात काही शंका नाही. आम्ही समाजाच्या पाठिशी आहोत. पण काही लोकं जाणिवपूर्वक २ समाजात वाद पेटवण्याचे काम करत आहेत. पण आम्ही तसे नाही आहोत. आम्ही योग्य मार्ग काढू.'