बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगे हे पाठपुरावा करत असून या प्रकरणी आता त्यांनी आणखी एक मोठी मागणी केली आहे.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अनैतिक संबंधातून दाखवण्याचा प्लॅन होता, असा आरोप त्यांचे बंधू धनंजय देशमुखांनी केला होता. आता या आरोपावरुन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी मागणी केली आहे. याप्रकरणी त्या बाईची चौकशी करा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.
धनंजय देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संतोष देशमुखांच्या हत्येबद्दल एक मोठा खुलासा केला होता. “संतोष देशमुख यांचा मृतदेह केजऐवजी कळबंकडे वळवण्यात आला होता. एका महिलेकडे घेऊन जायचं. छेडछाड झाली, कपडे फाडून घेतले असते, अंगाला जखम करून घेतल्या असत्या आणि या माणसाने असं केलं म्हणून या माणसाला समाजातून उठवलं असतं, असा त्यांचा प्लॅन होता”, असा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केला. आता यावर मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केले.
याप्रकरणी चौकशी काय, तिला कायमचं जेलमध्ये सडवलं पाहिजे. लोकांचे लेकरं मारून तुम्ही तयार होता असले प्रकार करू लागायला, किती नीच वृत्तीचे आहात तुम्ही. उलट तिने पुढे येऊन सांगायला पाहिजे, हो मला असे फोन आले होते. मला तयार हो म्हणत होते. मी तयार झाले नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना नाव कमवण्याची संधी आहे. देशमुख कुटुंबियांना सुद्धा न्याय मिळेल आणि मुख्यमंत्र्यांचेही नाव होईल की मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासारखा पाहिजे. कोणाची दयामाया करत नाही, मंत्री असला तरी जेलमध्ये फेकतो. गरीब मराठ्यांच्या पोराला जेलमध्ये फेकण्यात काय मर्दानगी आहे. गावकरी उपोषणावर बसण्यावर ठाम आहेत, जर ते उपोषणाला बसले तर राज्य ढवळून निघणार आहे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
“यात तपास यंत्रणांना दोष देऊन उपयोग नाही, मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. बीडच्या SP, कलेक्टरला दोष देऊन उपयोग नाही. जर वरूनच दबाव असेल तर तपास कसा करायचा?ती गाडी कळंबकडे गेली, ती कोणत्या मंत्र्याने तिकडे गाडी वळवली, कोणी फोन करून ते नियोजन केलं, कोणी तो कट रचला हे बाहेर येणे गरजेचे आहे. देशमुख कुटुंबीय आणि गावकऱ्यांवर सरकारने उपोषणाची वेळ आणू नये. संयम सुटला तर अवघड आहे”, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.