बीड : उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार बीडच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान विनाअनुदानित शिक्षक आक्रमक झाले आहेत. शाहू फुले आंबेडकर आश्रम शाळेतील शिक्षकांनी आक्रमक होत अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा आणि घेराव घालण्याचा प्रयत्न केला.
मिळालेल्या माहितीनुसार , बीडमध्ये शिक्षकांकडून रास्तारोको आंदोलन सुरू आहे. अजित पवारांच्या ताफ्यासमोर शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी या शिक्षकांना अडवण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनादरम्यान दोन शिक्षकाची प्रकृती बिघडली.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज बीडमध्ये असल्यामुळे शिक्षक आक्रमक होत त्यांनी थेट रस्तारोको आंदोलन सुरू केले आहे. अजित पवारांनी आंदोलकांना भेट न दिल्यामुळे शिक्षक आक्रमक होत थेट रस्त्यावरती उतरले आहेत.
बीडमध्ये सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आमची भेट घेऊन आम्हाला न्याय द्या अशी मागणी आंदोलक शिक्षकांनी अजित पवार यांच्याकडे केली आहे. पण अजित पवार हे भेट देत नसल्यामुळे ते आक्रमक झाले आहेत.
या आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले आहेत. विनाअनुदानित शिक्षक केशव आंधळे यांची उपोषणस्थळी तब्येत खराब झाली. गेल्या ९ दिवसांपासून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विनाअनुदानित शिक्षकांचे आमरण उपोषण सुरू आहे.
या उपोषणामधील शिक्षक केशव आंधळे यांना अचानक अस्वस्थपणा जाणवल्याने भोवळ आली. त्यांना रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले. तर आणखी एका महिला शिक्षिकेची प्रकृती खराब झाली असून त्यांना देखील रुग्णालयात हलवले आहे.
बीडच्या शाहू फुले आंबेडकर निवासी आश्रम शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी सुरू आहे. 'अजितदादा आमच्या आंदोलनाला भेट द्या... अजित दादा न्याय द्या... पंकजाताई आम्हाला न्याय द्या.. धनंजय नागरगोजे यांना न्याय द्या...', अशी मागणी हे शिक्षक करत आहेत.
९ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या शिक्षकांचे उपोषण सुरू आहे. आज अजित पवार बीड जिल्हा दौऱ्यावर असल्याने राज्यातील विविध जिल्ह्यातून शिक्षक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणात सहभागी झाले आहेत.