बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीडमधील पिंपरी घाट गावात गावजेवणाच्या कार्यक्रमानंतर तब्बल ५० जणांना विषबाधा झाली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , रात्री गावात जेवणाचा कार्यक्रम झाला. पहाटेपासून गावातील अनेकांना उलट्या, मळमळ, पोटदुखी यांसारखा त्रास व्हायला सुरुवात झाली. पीडितांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ५० ग्रामस्थांना पोटदुखी, उलट्यांसारखी लक्षणे जाणवू लागल्याने ग्रामस्थांनी तातडीने गावच्या सरपंचांना यासंबंधित माहिती दिली.
सरपंचांनी इतर गावकऱ्यांच्या मदतीने रुग्णांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सर्व रुग्णांवर सध्या अपघात विभागात उपचार सुरु आहेत.
रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सर्व ५० रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे. डॉक्टरांची टीम सातत्याने त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. आवश्यक ते वैद्यकीय उपचार सुरु आहेत. याचदरम्यान विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी अन्न नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील पिंपरी घाट गावात गावजेवणानंतर ५० जणांना विषबाधा झाली. पहाटे त्रास व्हायला सुरु झाल्यानंतर ५० रुग्णांना तातडीने स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाई येथे उपचारांसाठी पाठवण्यात आले. रुग्णालयात पीडितांवर उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.