बीडमध्ये धगधगत असलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी कमालीची आक्रमक भूमिका घेतली आहेत. एकीकडे सुरेश धस हे या प्रकरणातील एक आरोपी वाल्मिक कराड याच्याशी असलेल्या निकटच्या संबंधांवरून धनंजय मुंडे यांना सातत्याने टीकेचं लक्ष्य करत आहेत.
तर दुसकीकडे सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात एक बडी मुन्नी आहे, असा उल्लेख करत खळबळ उडवून दिली होती. तेव्हापासून अजित पवार गटातील ती बडी मुन्नी कोण, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. आता स्वत: सुरेश धस यांनीच त्या मुन्नीबाबत मोठा उलगडा केला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुरेश धस यांनी सांगितले की, मी ज्या मुन्नीचा उल्लेख केलाय, जी मुन्नी आहे तिला ते कळालेलं आहे. पण ती महिला भगिनी नाही आहे बरं का, नाही तर आणखी काही राळ उठायची. मी मुन्नी असा उल्लेख केला आहे. मात्र ती राष्ट्रवादीमधील पुरुष मुन्नी आहे. तसेच सुरेश धस माझ्याबाबतच बोलत आहे, हे त्या पुरुष मुन्नीला पक्कं माहित आहे. म्हणून कच्चेबच्चे लोक माझ्याविरोधात बोलायला पाठवू नका. तर स्वत: मुन्नीनेच समोर यावं, अशी विनंती मी मुन्नीला केली होती. तसेच मुन्नी आल्याशिवाय बोलायला मजा येणार नाही, असे सुरेश धस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सुरेश धस यांनी उल्लेख केलेल्या मुन्नीवरून राजकीय वर्तुळाच बरीच चर्चा रंगली होती. तसेच याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्याकडेही विचारणा करण्यात आली होती. मात्र या प्रश्नावर अजित पवार हे चांगलेच संतापल्याचं दिसून आलं होतं. हा प्रश्न तुम्ही सुरेश धस यांनाच विचारा. हे असले फालतू गोष्टी कोणी बोलत असेल, तर मी स्पष्ट नाव घेऊन बोलणार आहे. त्यामुळे त्यालाच विचारा कोण आहे.” असं म्हणत अजित पवार यांनी उलट सवाल केला होता.