नंदुरबार तालुक्यातील भिलाईपाडा या गावात खळबळजनक घटना घडली आहे. धार्मिक कार्यक्रमात जेवण करणं गावकऱ्यांना चांगलंच महागात पडलंय. गावामध्ये एका धार्मिक कार्यक्रमातून ग्रामस्थांना काही पदार्थ वितरित करण्यात आले होते. हा पदार्थ खाल्ल्यानंतर अनेकांना उलट्या आणि जुलाबाच्या त्रास जाणवू लागला होता. एक एक करून संपूर्ण गावातील नागरिकांना हा त्रास जाणवू लागल्याने ते रुग्णालयात उपचारासाठी जाऊ लागले.
यानंतर त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर बाधित ग्रामस्थांना नंदुरबार जिल्हा रुग्णालय येथे उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित व माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना गावित रुग्णालयात दाखल झाले त्यांनाही यावेळी रुग्णांची विचारपूस केली.