नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. भरदिवसा सराफ व्यावसायिकाच्या अपहरणाने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील बुडीगव्हाण गावाजवळ भरदिवसा सराफ व्यावसायिक रितेश पारेख यांचे अज्ञात हल्लेखोरांनी अपहरण केले. या वेळी लुटारूंनी त्यांच्या वाहनाची तोडफोड करत अंदाजे ५० किलो चांदी, सोने आणि मोठी नगद रक्कम लुटल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातून म्हसावद गावाकडे व्यापारासाठी जात असताना रितेश पारेख यांना चोरट्यांनी लक्ष्य केले. हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनाच्या काचा फोडल्या आणि त्यांना धमकावले. त्यातच धक्कादायक आणि संतापजनक बाब म्हणजे, अपहरण करण्यापूर्वी व्यावसायिकाचे कपडे काढून नग्न अवस्थेत मारहाण करण्यात आली आणि याच नग्न अवस्थेत त्यांचे अपहरण करण्यात आले.
म्हसावद पोलीस ठाण्यापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर ही घटना घडल्यामुळे पोलिसांच्या गस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या घटनेमुळे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच रितेश पारेख यांचे नातेवाईक आणि शहरातील सोनार व्यावसायिक यांनी शहादा पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला.
अपहरणकर्त्यांना लवकरात लवकर शोधून त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.