पश्चिम बंगाल विधानसभेचं तीन दिवसांचं विशेष अधिवेशन १ सप्टेंबरपासून सुरू होतं. गुरूवार हा अधिवेशनाचा शेवटचा दिवस. दरम्यान गुरुवारी पश्चिम बंगाल विधानसभेत मोठा राडा पहायला मिळाला. या राड्यामुळे भाजपच्या ३ आमदार सस्पेंड करण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं ?
बंगाली स्थलांतरितांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने ठराव मांडला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी प्रस्तावावर बोलणार होत्या. या चर्चेदरम्यान विरोधी पक्ष भाजपने घोषणाबाजी सुरू केली. भाजप आमदारांनी विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांच्या निलंबनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत घोषणाबाजी केली. याला तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनी तीव्र विरोध दर्शवला.
गदारोळ वाढताच विधानसभा अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांनी गोंधळ निर्माण केल्याच्या आरोपावरून भाजपचे मुख्य प्रतोद शंकर घोष यांना सभागृहातून निलंबित केले. मात्र, घोष यांनी सभागृहातून बाहेर जाण्यास नकार दिला. यामुळे मार्शल्स अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. त्यांना जबरदस्तीने बाहेर खेचण्यात आले.या धक्काबुक्कीत शंकर घोष बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने रूग्णवाहिकेतून रूग्णालयात हलवण्यात आले. याशिवाय भाजपचे आणखी २ आमदार अग्निमित्रा पॉल आणि मिहिर गोस्वामी यांनाही सभागृहातून निलंबित करण्यात आले.