बलात्काराच्या घटना अद्यापही थांबलेल्या नाहीत. घराबाहेरच नाही तर घरात देखील मुली सुरक्षित नाही. शाळा, महाविद्यालयातही त्या सुरक्षित राहिल्या नाहीत. पश्चिम बंगालमध्ये खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीवर महाविद्यालयाच्या आवाराबाहेरच तीन अनोळखी व्यक्तींनी सामूहिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार शुक्रवारी समोर आला. सध्या पीडितेवर उपचार सुरू आहेत.

अत्याचाराला बळी पडलेली पीडित विद्यार्थिनी ही ओडिशा राज्यातील रहिवासी आहे. त्यामुळे ओडिशा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष शोभना मोहंती यांनी या प्रकरणात सहभागी असणाऱ्या सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथील खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी रविवारी तिघांना अटक करत एका संशयिताला ताब्यात घेतले. या तिघांना उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांनी दहा दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. या घटनेमुळे येथील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्षांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
पश्चिम बंगालमध्ये माझ्या मुलीची सुरक्षितता धोक्यात असल्याचा दावा पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी केला आहे. मुलगी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.
मुलीला चालता येत नसून ती बेडरेस्टवर असल्याचे नमूद करत वडिलांनी तिच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली.
दुर्गापूर येथील सामूहिक बलात्काराची घटना अत्यंत धक्कादायक आहे. असे गुन्हे करणाऱ्या आरोपींबद्दल आमच्या सरकारचे कठोर धोरण राबवले. या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, इतरांचा शोध सुरू आहे.
ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री