भुवनेश्वरमधील मंचेश्वर पोलिसांनी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या ओडिशा युनिटचे अध्यक्ष उदित प्रधान यांना अटक करण्यात आली आहे. १९ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीच्या पेयात गुंगीचे औषध मिसळून तिच्यावर बलात्कार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. रविवारी रात्री उशिरा त्यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले.
पीडितेच्या तक्रारीनुसार, ही घटना १८ मार्च रोजी घडली. पीडितेने सांगितले की, ती तिच्या दोन मैत्रिणींसोबत भुवनेश्वरच्या मास्टर कॅन्टीन परिसरात प्रधान यांना भेटली होती. त्यानंतर ते सर्वजण प्रधान यांच्या गाडीतून नयापल्ली येथील एका हॉटेलमध्ये गेले. हॉटेलमध्ये, गटातील इतरांनी मद्यपान केले, मात्र पीडितेने मद्यपान करण्यास नकार दिला. तेव्हा प्रधान यांनी तिला एक शीतपेय दिले.
या पेयात गुंगीचे औषध मिसळले असल्याचा आरोप तिने केला आहे. ते प्यायल्यानंतर तिला चक्कर येऊ लागली आणि तिने घरी सोडण्याची विनंती केली. मात्र, प्रधान आणि इतरांनी तिला हॉटेलमधून जाऊ दिले नाही. ती बेशुद्ध झाली आणि शुद्धीवर आल्यावर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे तिच्या लक्षात आले. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत प्रधान यांना अटक केली. या आरोपांनंतर राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेने (NSUI) उदित प्रधानला तात्काळ संघटनेतून निलंबित केले.