नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : प्रेमाच्या जाळ्यात अडकवून एका इसमाने विवाहितेवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याची घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पीडित महिला आणि या गुन्ह्यातील आरोपी महिला हे एकमेकांच्या शेजारी राहतात. आरोपी महिला हीं आरोपी अनिल आहेर याची नातेवाईक आहे.
अनिल आहेर याने तिच्या माध्यमातून पीडितेशी जवळीक निर्माण करून प्रेमसंबंध निर्माण केले. त्याने पाथर्डी फाटा, अलिबाग व नांदगाव या ठिकाणी सप्टेंबर 2023 ते दि. 11 जुलै 2025 या काळात पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून तिच्यावर अत्याचार केले. पीडितेला तिच्या पतीची भीती घालून नंतर त्याने अलिबाग येथे अत्याचार केले.
“तुझ्यासोबत जे घडले आहे, ते पोलीस स्टेशनला खरे सांगितले, तर तुला व तुझ्या कुटुंबीयांना जिवंत सोडणार नाही,” असा दम तो भरत होता. “मी सांगेन तसे पोलिसांसमोर जबाब दे,” असा आग्रह तो तिच्याकडे धरत होता. त्याच्या या त्रासाला कंटाळून पीडितेने अनिल आहेर व त्याच्या नातेवाईक महिलेविरुद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी अनिल आहेर याला अटक केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.