इगतपुरी (भ्रमर वार्ताहर) :- इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथे शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकानेच शिक्षकाच्या मदतीने १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. घोटी पोलिसांना याबाबत माहिती समजताच मुख्याध्यापकासह शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
भारतीय न्याय संहिता आणि बाल संरक्षण व अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टाकेद बुद्रुक परिसर आणि संपूर्ण इगतपुरी तालुक्यात या संतापजनक घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ टाकेद बुद्रुक भागात आज निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.
शाळेत सहावीत शिकणार्या बारा वर्षांच्या पीडित विद्यार्थिनीवर मुख्याध्यापक तुकाराम साबळे याने अत्याचार केला. वर्गशिक्षक गोरख जोशी याने तुकाराम साबळेच्या सांगण्यावरून पीडित मुलीला काल दुपारी मुख्याध्यापकाच्या घरी नेले. यानंतर मुख्याध्यापक तुकाराम साबळे याने अत्याचार करून पीडित मुलीला घरी पाठवून दिले. पीडित मुलीला अत्याचारामुळे त्रास होत असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आल्यावर त्यांनी घोटी पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी तातडीने दखल घेऊन तुकाराम साबळे, वर्गशिक्षक गोरख जोशी या संशयित आरोपींना अटक करून तपास सुरू केला आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विनोद पाटील, उपनिरीक्षक अजय कौटे आणि पथक तपास करीत असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.
राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे हे कालपासून इगतपुरी तालुक्याच्या दौर्यावर आहेत. शिक्षणमंत्री तालुक्यात असताना ही घटना घडणे दुर्दैवी आहे. ते या घटनेबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.