ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एका गायिकेला मोठ्या म्यूझिक प्रोजेक्टचं आमिष दाखवून तिला जाळ्यात ओढून चंद्रशेखरपूर परिसरातील एका लॉजमध्ये नेऊन तिच्यावर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडितेला प्रथम दारू पिण्यास भाग पाडले आणि नंतर अंमली पदार्थ मिसळलेले कोल्ड्रिंक दिले. काही वेळातच ती बेशुद्ध पडली आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. आरोपींच्या तावडीतून सुटून गायिका घरी पोहोचली आणि कुटुंबीयांना संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर तिने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
ही घटना १० सप्टेंबर रोजी घडली असून, पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून तिन्ही आरोपींना अटक केली आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. या घटनेत इतर व्यक्तींचा सहभाग आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपींनी यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का याचाही तपास सुरू आहे.