संतापजनक! शाळेमध्येच शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार
संतापजनक! शाळेमध्येच शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार
img
Dipali Ghadwaje
गुंगीच्या गोळ्या देऊन विद्यार्थिनीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरमधून समोर आली आहे. शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली. विशेष म्हणजे आरोपी शिक्षक काँग्रेसचा पदाधिकारी असल्याची माहिती देखील समोर आली आहे. या घटनेमुळे चंद्रपूरमध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या ११ वर्षांच्या मुलीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केले. यासंबंधीची तक्रार पीडीतेने कोरपना पोलिसात केली असून शिक्षकाविरोधात पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार शिक्षकाला आज पहाटे अकोल्यातून अटक करण्यात आली. 

ही घटना मे महिन्यातील असून याची तक्रार मंगळवारी करण्यात आली. पीडित मुलगी एक्स्ट्रा क्लास करण्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये शाळेत जात होती. इतरही विद्यार्थी या वर्गाला यायचे. आरोपी शिक्षक अमीत लोडे हा वर्ग घ्यायचा. एक दिवस त्याने पीडित मुलीला कार्यालयात बोलावून तिला गुंगीच्या गोळ्या दिल्या आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. 

मुलगी शुद्धीवर आल्यावर तिने घडलेली गोष्ट घरी सांगू नये म्हणून त्याने तिला धमकावले. त्यामुळे ही मुलगी गप्प राहिली. पण पीडित मुलीने हा प्रकार वर्गातील मैत्रिणीला सांगितला होता. या मैत्रिणीने तिच्या आईला हा प्रकार आता सांगितल्यावर पीडितेच्या आईने मंगळवारी पोलिसात तक्रार दिली.

त्यावरून आरोपी शिक्षकाविरोधात पॉक्सो आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसामध्ये तक्रार झाल्यानंतर हा शिक्षक फरार झाला होता. मात्र आज पहाटे त्याला अकोला येथून अटक करण्यात आली. आरोपी शिक्षक हा कोरपना येथे युवक काँग्रेसचा पदाधिकारी आहे. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group