राज्यात मुली-महिलांवरील अत्याचाराच्य घटना दिवसेंदिवस वाढतच असून कधी बाहेरचे तर कधी घरातलेच हे हैवानी कृत्य करताना समोर येत आहेत. अशातच मुंबईमध्ये १३ वर्षांच्या मुलीवर आजोबांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पवईमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत अवघ्या काही तासांमध्ये त्याला अटक केली. या घटनेमुळे पवईमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पवईमध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चुलत आजोबांनी लैंगिक अत्याचार केले. गेल्या महिन्याभरापासून या मुलीवर लैंगिक अत्याचार सुरू होते. मुलीचे आई-वडील कामावर गेल्यावर चुलत आजोबा हे घाणेरडं कृत्य करत होता.
मुलीवर अत्याचार केल्यावर आरोपी तिला धमकी देखील देत होता त्यामुळे पीडित मुलगी निमुटपणे सर्वकाही सहन करत होती. कोणाला सांगितल्यास तुझ्या आई-वडिलांना जीवे मारेल अशी धमकी आरोपी पीडित मुलीला देत होता. पण त्रास होऊ लागल्यामुळे पीडित मुलीने घटनेची माहिती आपल्या आईला दिली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीच्या आईने तात्काळ पवई पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली. आरोपी ४० वर्षांचा असल्याची माहिती समोर आली.
अटकेनंतर पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केले होते. कोर्टाने आरोपीची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. सध्या पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.