पश्चिम बंगालमधुन मोठी बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन झालं आहे. कोलकाता येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 80 वर्षांचे होते.
मिळालेल्या माहितीनुसार , बंगालच्या माजी मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी सकाळी 8.20 वाजता अखेरचा श्वास घेतला. ते बरेच दिवस आजारी होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यामुळे त्यांना जुलैमध्ये रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. ते दीर्घकाळापासून सीओपीडी (क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज) आणि वृद्धापकाळाशी संबंधित इतर आजारांनी त्रस्त होते. त्याच्यावर कोलकाता येथील घरी उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.
बुद्धदेव भट्टाचार्य कोण होते?
भट्टाचार्य 2000 ते 2011 पर्यंत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. ते भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) च्या पॉलिटब्युरोचे सदस्यही होते. बुद्धदेव भट्टाचार्य यांचा जन्म 1 मार्च 1944 रोजी उत्तर कोलकाता येथे झाला. नंतर त्यांनी माकपमध्ये प्रवेश केला. त्यांना डेमोक्रॅटिक युथ फेडरेशनशी जोडले गेले. त्यांना सीपीआयच्या युवा शाखेचं राज्य सचिव बनवण्यात आलं, जी नंतर डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियामध्ये विलीन झाली होती.