पाकिस्तानमधून भारतात आलेल्या सीमा हैदर ही फेब्रुवारी २०२६ मध्ये सहाव्यांदा आई बनली होती. गुरुवारी सीमा आणि तिचा पती सचिन यांनी मुलाचे नामकरण केले मुलाच्या नामकरणाबाबत सीमा हैदर म्हणाली, “हिंदू धर्मात घरात मुलगा झाल्यावर नामकरण केले जाते. हा दुसरा कुआं पूजन आहे. याआधी मीरा झाली तेव्हा देखील हा विधी केला होता. मला खूप छान वाटतं आणि आनंद होतो. आपला हिंदू धर्म खूप सुंदर आहे. छोटे-छोटे सण प्रेम वाढवतात. मी खूप आनंदी आहे आणि मला कधीही पश्चात्ताप होत नाही, असे सीमा हैदर म्हणाली.
या जोडप्याने आपल्या मुलाचे नाव ‘भारत’ ठेवले असून हे नाव समजल्यानंतर शेजारी देश पाकिस्तानला नक्कीच ‘मिरची’ लागेल, अशी चर्चा रंगली आहे. नामकरण सोहळा नोएडाच्या रबुपुरा येथील त्यांच्या घरात झाला. यावेळी सीमाने हिंदू धर्माबद्दल आपली भावना व्यक्त केली. मुलाचे नाव ‘भारत’ ठेवण्यामागचे कारण सांगताना सीमा म्हणाली, “पंडितांनी नाव काढले ते ‘भ’ अक्षरावरून आले. तेव्हा आम्हाला वाटलं की ‘भारत’पेक्षा सुंदर नाव दुसरे असूच शकत नाही, म्हणून आम्ही तेच ठेवले.”
सीमा हैदरला PUBG खेळताना ग्रेटर नोएडातील सचिन मीणा याच्यावर प्रेम जडलं, तेव्हा ती चार मुलांची आई होती. प्रेम इतकं वाढलं की ती चार मुलांसह नेपाळमार्गे भारतात आली. जुलै २०२३ मध्ये हा प्रकार उघड झाल्यानंतर सीमा आणि सचिन यांना अटक करण्यात आली होती. नंतर त्यांना जामीन मिळाला. तेव्हापासून सीमा सचिनसोबत राहत असून त्यांनी लग्न केलं आहे. या दोघांना दोन मुले आहेत. सीमा स्वतःला आता हिंदू आणि हिंदुस्थानी म्हणते. मात्र, तिला अद्याप भारतीय नागरिकत्व मिळालेले नाही आणि त्यासाठीची तिची याचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे.