मागील वर्षी वडीलांच्या झालेल्या हत्येचा राग मनात धरून मुलाने वडीलांची हत्या करणाऱ्या आरोपी आणि त्याच्या आईची हत्या केलीये. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
गेल्या वर्षी किरकोळ कारणावरून अमोल डाखोरे याने सुधाकर अवझाड यांची हत्या केली होती. या गोष्टीचा राग मृत बापाच्या मुलाच्या मनात धगधगत होता. त्यानं बापाच्या हत्येचा बदला घेण्याचे ठरवले. राग मनात धरून मुलानं वडलांना संपवणाऱ्याची अमोल डाखोरे आणि त्याच्यासोबत त्याची आई सुशिला डाखोरे या दोघांची हत्या केली.
ही दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरात घडली. आरोपीनं घरासमोरच अमोल आणि त्याच्या आईवर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात अमोलचा जागीच मृत्यू झाला. तर सुशीला यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आजी आणि वडिलांवर हल्ला होत असल्याचं पाहताच हिमांशु डाखोरे (वय १० वर्ष) हा मदतीसाठी धावून गेला. मात्र, मुलाच्या डाव्या हाताची दोन्ही बोटं कापली गेली. जुन्या वैमन्यासातून हा वाद झाला असल्याची माहिती आहे.
या प्रकरणाची माहिती तिवसा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपास करीत पोलिसांनी आरोपी रोहनला काही तासांतच अटक केली आहे. सध्या या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू असून, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.