जीएसटी परिषदेच्या बैठकीमध्ये बुधवारी रात्री मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व राज्यांशी सहमतीतून, ५ टक्के आणि १८ टक्के अशे फक्त दोनच स्लॅब ठेवण्यात आले आहेत. म्हणजेच १२ आणि २८ टक्के हे कर रद्द करण्यात आले आहेत. जीएसटी आल्यापासून ही आतापर्यंतची सर्वात मोठी सुधारणा आहे. या निर्णयामुळे दैनंदिन वापरातील तेल, शाम्पू, टूथपेस्टसह अनेक वस्तू आता फक्त ५ टक्के स्लॅबमध्ये येमार आहेत.
सरकारने कृषी क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. आता ट्रॅक्टरचे टायर आणि सुट्या भागांवरील जीएसटी 18% वरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. आता ट्रॅक्टरवर 12% ऐवजी फक्त 5% कर आकारला जाईल.तसेच बायो-पेस्टीसाईड्स जैव-कीटकनाशके, ठिबक सिंचन प्रणाली आणि आधुनिक कृषी यंत्रसामग्री देखील आता 5% कर स्लॅबमध्ये आणण्यात आल्या आहेत. यामुळे शेतीचा खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांना थेट फायदा होईल.
ऑटोमोबाईल क्षेत्राला दिलासा देण्यासाठी देखील कर कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता काही पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी वाहने, जी पूर्वी 28% कर स्लॅबमध्ये होती, ती 18% स्लॅबमध्ये आणण्यात आली आहेत.तीनचाकी वाहनं,350cc पर्यंतच्या मोटारसायकल, आणि वस्तूंच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक वाहनांवरही आता 18% जीएसटी आकारला जाईल. यामुळे ऑटो क्षेत्राला चालना मिळेल आणि ग्राहकांसाठी वाहने स्वस्त होतील.