पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात बनावट जीएसटी अधिकाऱ्यांनी छापेमारी केल्याची घटना घटली. या छापेमारीत तोतया जीएसटी अधिकाऱ्यांनी व्यावसायिकाचे २ लाख रुपये लंपास केल्याचे उघड झाले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात असलेल्या भुसार विभागात संबंधित सुपारी व्यावसायिकाचे दुकान आहे. दिनांक आठ फेब्रुवारी रोजी या दुकानावर पाच ते सहा तोतया जीएसटी अधिकाऱ्यांनी छापा टाकला.
यावेळी या तोतया अधिकाऱ्यांनी दुकानांमध्ये मालाची आणि बिलांचे रेकॉर्ड मागवत मालाचा व्हिडिओ काढून चेकिंगच्या नावाखाली दबाव टाकला. तसेच तब्बल दोन लाख रुपये लंपास केले. ही घटना आठ फेब्रुवारी रोजी घडली मात्र गुन्हा २७ फेब्रुवारी रोजी पोलिसात तक्रार देण्यात आली.
याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमध्ये ६ बनावट जीएसटी अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.