दैनिक भ्रमर : या दिवाळीच्या आधी केंद्र सरकार ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ज्यामुळे सर्वसामान्याना दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने जीएसटी प्रणालीत मोठा बदल प्रस्तावित केला आहे. सरकारी सूत्रांनुसार, नवीन रचनेत 5 टक्के आणि 18 टक्के असे जीएसटीचे दोन मुख्य दर असतील, याशिवाय, लक्झरी आणि हानिकारक वस्तूंवर (जसं की दारू, तंबाखू इ.) यावर 40 टक्के विशेष कर लावला जाईल.
दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील. पण सध्या त्या काय आहेत हे स्पष्ट नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, यामध्ये टूथपेस्टपासून छत्री आणि लहान घरगुती उपकरणं, जसे की शिलाई मशीन, प्रेशर कुकर आणि लहान वॉशिंग मशीन यांचा समावेश असू शकतो. टेलिव्हिजन, एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन आणि एरेटेड वॉटर, तसेच बांधकाम उद्योगात वापरल्या जाणाऱ्या काही वस्तू, जसx की रेडी-मिक्स कॉंक्रिट आणि सिमेंट, नवीन १८ टक्के जीएसटी यादीत असण्याची शक्यता आहे. सायकल, तयार कपडे आणि शूज-चप्पल यांचा देखील समावेश असू शकतो.
सध्या प्रवासी वाहनांवर २८ टक्के जीएसटी आणि इंजिन क्षमता, लांबी आणि बॉडी टाईपनुसार २२ टक्के भरपाई उपकर आकारला जातो. इलेक्ट्रिक कारवर पाच टक्के कर आकारला जातो आणि कोणताही भरपाई उपकर आकारला जात नाही. सुधारित जीएसटी रचनेमुळे २८ टक्के श्रेणी रद्द करण्यात आली आहे, म्हणजेच कार आणि बाईक नवीन १८ टक्के श्रेणीत येतील, ज्यामुळे त्या किमान १० टक्के स्वस्त होतील.