सांगलीच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल, दोन मुख्याध्यापकांसह अधीक्षक निलंबित
सांगलीच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल, दोन मुख्याध्यापकांसह अधीक्षक निलंबित
img
Dipali Ghadwaje
सांगली : आश्रमशाळेतील जवळपास 169 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्यामुळे अचानक प्रशासनाची मोठी धावपळ झाली होती . जत तालुक्यातील उमदी  येथील समता आश्रम शाळेतील ही घटना घडली होती. दरम्यान येथील आश्रमशाळेत जवळपास 169 विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधा प्रकरणात अखेर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन मुख्याधापक आणि अधीक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर निलबंनाची कारवाई केली आहे.  

दरम्यान या प्रकरणी व्यवस्थापकांची गंभीर चूक असल्याचं देखील निदर्शनास आलं. तसेच संस्थेची मान्यता का रद्द करु नये अशी कारणे दाखवा नोटीसही व्यवस्थापनाला बजावण्यात आली.

या प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यामध्ये संस्थेचे सचिव श्रीशैल कल्लाप्पा होर्तीकर, मुख्याध्यापक सुभाषचंद्र महादेवाप्पा होर्ती, मुख्याध्यापक सुरेश चनगोंड बगली, अधीक्षक विकास तुकाराम पवार, अधीक्षक अक्कमहादेवी सिद्धन्ना निवर्गी यांचा समावेश आहे. 

नेमकं प्रकरण काय?
शनिवार (27 ऑगस्ट) रोजी संध्याकाळी साडेपाच ते साडेसहाच्या सुमारास समता प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले होते. जेवणानंतर काही विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागला. ही बाब निर्दशनास आल्यानंतर तात्काळ विद्यार्थ्यांना उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये 169 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे निर्दशनास आले. घटनेचे गांभीर्य ओळखून सर्वच यंत्रणा कामाला लागली. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. 

राज्य शासनाने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाठवले. चौकशी, तपासणी झाल्यानंतर अखेर बुधवारी रात्री उशिरा याप्रकरणी समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त चाचरकर यांनी फिर्याद दिली. बाहेर जेवणं बनवणं, शिल्लक जेवण विद्यार्थ्यांना देणं या गोष्टी या प्रकरणातील चौकशीमध्ये समोर आल्या आहेत.

तसेच संशयितांनी देखील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या बाबतील निष्काळजीपणा आणि हयगय केल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका आणि वैयक्तिक सुरक्षितता यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमदीचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे याप्रकणी अधिक तपास करत आहेत. 

विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर
विषबाधा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना उलटी, जुलाब अशी लक्षणं दिसून आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय जत, माडग्याळ, कवठेमहांकाळ आणि मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आले. वेळीच उपचार झाल्याने सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं.

दरम्यान यावेळी जत ग्रामीण रुग्णालयात 81 विद्यार्थी, ग्रामीण रुग्णालय माडग्याळ येथे 21, ग्रामीण रुग्णालय कवठेमहांकाळ इथे 41 आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय मिरज येथे 26 विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले आहेत. मुलांवर उपचार करताना प्रशासनाने योग्य ती खरबदारी घेतल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group