नांदेड (भ्रमर वृत्तसेवा) : जिल्ह्यांमधून भाविकांना प्रसादातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विषबाधा झाल्याची माहिती मिळताच त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात ही घटना घडली आहे. लोहा तालुक्यातील कोष्टवाडीमध्ये संत बाळुमामा यांच्या पालखी सोहळ्यात आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर भंडारा होता. काल एकादशी असल्यामुळे भाविकांना भगर हा महाप्रसाद देण्यात आला.
भगर खाल्यामुळे अनेकांना उलटी, मळमळ, चकर येणे असा त्रास सुरु झाला. या कार्यक्रमाला सावरगाव, कोष्टवाडी, हरणवाडी, पेंडु, सादलापुर या गावातील नागरिक आले होते. त्यांना देखील विषबाधा झाली. मिळेल त्या वाहनांनी बाधितांना रुग्णालयात पाठवण्यात आले.
रुग्णाची संख्या अधिक असल्याने नांदेडच्या शासकीय रुग्णालयात देखील रुग्णांना दाखल करण्यात आले. रुग्णांवर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर यांनी दिली. प्रसादातून विषबाधा झाल्यामुळे भाविकांमध्ये काहीसं घाबरटीचे वातावरण होते.
परभणी तालुक्यात चारशे ते पाचशे जणांना विषबाधा
परभणी तालुक्यात चारशे ते पाचशे जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्यावर देखील सोना गावात व परभणीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सध्या सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. परभणी तालुक्यातील सोना या गावात सप्ताह सुरू आहे. त्यानिमित्ताने सकाळी साबुदाणा, उसळ व केळीचा प्रसाद देण्यात आला होता. तर रात्री भगर व आमटी करण्यात आली होती. भगर व आमटी खाल्यानंतर गावकऱ्यांना मळमळ व उलट्या सुरू झाल्या.
गावकऱ्यांनी प्रशासनाला माहिती दिल्यानंतर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आरोग्य विभागाला सोबत घेत गावात उपचार सुरू केले.
काहींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत.