सांगलीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर सुरेश पाटील यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , सुरेश पाटील यांनी आपल्या निवासस्थानी साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना समोर येताच कुटुंबीयांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सुरेश पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजतेय. सुरेश पाटील यांनी टोकाचे पाऊल का उचलले ? याबाबत अद्याप कोणतेही ठोस कारण समोर आलेले नाही.
सुरेश पाटील हे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षात उभी फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला होता.
सुरेश पाटील हे सांगलीच्या राजकारणातील एक प्रभावशाली नाव आहे. महापौरपदासह त्यांनी अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या होत्या. त्यांच्या या कृतीमुळे त्यांचे समर्थक आणि कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.