रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशातच सांगलीमध्ये भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
दुचाकी आणि प्रवासी जीपची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. सांगलीच्या कवलापूरजवळ हा अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीच्या कवलापूरजवळ दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव प्रवासी जीपने दुचाकीवरून जाणाऱ्या कुटुंबाला धडक दिली. या अपघातामध्ये दिपाली विश्वास म्हारगुडे (२८ वर्षे), सार्थक (७ वर्षे) आणि राजकुमार (५ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर विशाल दादासो म्हारगुडे (३० वर्षे) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. अपघातातील जखमी आणि मृत हे सर्वजण आटपाडी येथील तळेवाडी येथे राहणारे आहेत.
विशाल म्हारगुडे हे मुळचे आटपाडीचे असून सांगली येथे राहणारे आहेत. ते दुचाकीवर पत्नी आणि दोन मुलांना घेऊन लग्नासाठी जात होते. त्याचेवळी समोरून येणाऱ्या भरधाव प्रवासी जीपने दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला. या अपघाताचा तपास सांगली पोलिसांकडून सुरू आहे.