वाहनांच्या अपघातांमध्ये दिवसेंदिवस चिंताजनक वाढ होत असून अतिशय भीषण अशा अपघातांच्या घटना घडत असल्याच्या बातम्या समोर येत असतात. दरम्यान अशाच एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की , डंपरने एका दुचाकीला धडक दिली कि या अपघतात डंपरने तरुणीला फरफट नेले आणि त्यातच तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
साताऱ्यामधून अपघाताची धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका भरधाव डंपरने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली आणि काही अंतर दूर फरफटत नेलं. या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या तरुणीच्या मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर नाका येथे सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सोनिया अविनाश कांबळे (वय २२) असं अपघातात ठार झालेल्या तरुणीचं नाव आहे. सोनिया कांबळे ही तरुणी येथील वैद्यकीय महाविद्यालयात बीडीएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयातून ती दुचाकी (क्रमांक एम एच ५० के ०८१० ) वरून कराड इथं घरी जात होती. पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर नाका इथं आली असता डंपर (क्रमांक एम एच १७ बी वाय ७०४१) ने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की, धडक देऊनही डंपर थांबला नाही. डंपरने दुचाकीसह सोनियाला फरपटत नेलं. या अपघातात ती गंभीर जखमी झाली. घटनास्थळी आजूबाजूच्या नागरिकांसह वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती कराड शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली. माहिती मिळताच अपघात विभागाचे हवालदार धीरज चतुर आणि महाले अपघात स्थळी दाखल झाले. तोपर्यंत नागरिकांनी आणि वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सोनियाला गंभीर जखमी अवस्थेत नजीकच असलेल्या रुग्णालयात नेलं.
मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. अपघाताचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी पोलिसांनी डंपरचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.