अहिल्यानगर : रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, अशातच अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात पहाटेच्या सुमारास क्रूझर गाडीचा अपघात होऊन दोनजण ठार तर १२ जण जखमी झालेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील केसरी स्पोर्ट अकॅडमीतील १३ मुलं MPL अर्थात महाराष्ट्र प्रीमिअर लीगचे क्रिकेट सामने बघण्यासाठी पुण्याला गेले होते.
परतत असताना आज पहाटे नेवासा तालुक्याच्या हद्दीतून जाणाऱ्या अहिल्यानगर ते संभाजीनगर महामार्गावर हा अपघात झालाय. क्रूझर गाडीने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्यानं गाडीचं छत अक्षरशः उडून गेलं.
या अपघातात
दोन मुलांचा मृत्यू झाला असून जखमींवर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बोदवड येथे आपल्या माघारी परतत असताना अहिल्यानगर ते संभाजीनगर महामार्गावर उत्सळ दुमाला ता.नेवासा गावाच्या हद्दीत पहाटे ५.१५ वाजण्याच्या सुमारास क्रुझर गाडीने ट्रकला पाठीमागून डॅश केल्यानं क्रुझर गाडीमधील प्रथमेश तेली नावाचा आणि अजून अन्य एक मुलाचा जागेवरच मृत्यू झालेला आहे. आणखी एक वृषभ सोनवणे नावाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे, त्याला साईदिप हॉस्पिटल अहिल्यानगर येथे भरती केलं आहे.
दरम्यान, इतर ११ मुलांवर डॉ. पाटील हॉस्पिटल नेवासा फाटा येथे उपचार चालू आहे. सदरचा अपघात क्रुझर चालकाच्या चुकीमुळे झाला आहे. चालकावर गुन्हा नोंदवण्याचं कामकाज चालू आहे.