संगमनेर : पुणे येथून कारमधून नाशिकला लग्नासाठी जात असताना पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळवाडी शिवारात (बोटा, ता. संगमनेर) अपघात होवून पती-पत्नीचा मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , ही घटना प्रजासत्ताक दिनी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे. यामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे.पुणे शहरातील गुरुवार पेठ-दरेकरवाडा येथील सचिन वसंतराव दरेकर (वय ५७), रमा सचिन दरेकर (वय ५३), सीमा सुरेंद्र देशमुख व सुरेंद्र देशमुख रविवारी पहाटे साडेपाच वाजता कारमधून नाशिकला लग्नासाठी चालले होते.
दरम्यान, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळवाडी शिवारात आले असता अपघात झाला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात हलविले होते. मात्र, सचिन व रमा दरेकर दोघे उपचारांपूर्वीच मृत पावल्याचे घोषित केले, तर गंभीर जखमी सीमा देशमुख यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच तत्काळ घारगाव पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.