अपघातांचे सत्र सुरूच आहे. केरळच्या अलाप्पुझा भागात सोमवारी रात्री भीषण रस्ते अपघातात ५ MBBS च्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रात्री १० च्या सुमारास कलाकोड परिसराजवळ घडली. हा अपघात इतका भयंकर होता की त्यात संपूर्ण कारचा चक्काचूर झाला. कारचे लोखंडी पार्ट वेगळे करून विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , ही मुले ज्या कारमधून प्रवास करत होती ती कार केरळ राज्य परिवहन मंडळाच्या बसला धडकली. अपघातातील मृत विद्यार्थी सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये MBBS चं शिक्षण घेत होते. कारमध्ये एकूण ७ जण प्रवास करत होते, त्यातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. इतरांना जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
या दुर्घटनेत बसमधील काही प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे. हा अपघात कशामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.
अलाप्पुझा येथील टीडी मेडिकल कॉलेजमध्ये हे ५ विद्यार्थी एमबीबीएसच्या पहिल्या वर्गात शिकत होते. मृतकांमध्ये लक्षद्विपचा देवनंदन, मोहम्मद इब्राहिम, आयुष शाजी, श्रीदीप वलसन आणि मोहम्मद जब्बार याचा समावेश आहे. रेस्क्यू टीममध्ये या पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी मेटल कटरचा वापर करून कारचे काही भाग कापावे लागले.
दरम्यान, अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले आहे. ५ जणांना मृत घोषित करण्यात आले. पावसामुळे रस्ता निसरता झाल्याचा अंदाज आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. अपघाताचे कारण काय हे समोर येऊ शकले नाही.