स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जालन्यातील परतूर तालुक्यातील उस्मानपुर गावातून राज्य परिवहन महामंडळाची बस धावली. यामुळे गावाक-यांमध्ये आनंदाचे वातावरण हाेते.
गावातून बस सुरु झाल्याने परतूर ते उस्मानपूर येथे जाणा-या शाळेसाठी जाणा-या विद्यार्थ्यांची पायपीट थांबल्याचा आनंद विद्यार्थ्यांचा बसमधून प्रवास करताना दिसत हाेता.
ही बस मानवविकास याेजने अंतर्गत सुरु झाली आहे. परतूर शहरापासून बारा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या उस्मानपूर गावात सहावी पर्यंतच शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी मुलींना परतूर शहरात यावं लागतं होत. गावातून शहरात येण्यासाठी बस नसल्याने मुलींचे शिक्षणापासून वंचित राहण्याचे प्रमाण वाढले होते.
दरम्यान ग्रामस्थांनी पुढाकार घेत बस सेवा करण्यासाठी प्रयत्न केले. गावात पहिल्यांदाच बस आल्याने ग्रामस्थांनी बसचे जंगी स्वागत केले. यावेळी बस चालकाचा आणि कंडक्टर यांचा गावकऱ्यांनी सत्कार केला. उस्मानपूर गावातून बस सुरू झाल्यामुळे आता गावातील मुलींची शाळेसाठीची पायपीट थांबणार आहे. त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणाच प्रमाण देखील वाढू शकतं असं मत गावकऱ्यांनी यावेळी व्यक्त केलं.