एसटी बस झाडावर आदळल्याने मोठा अपघात;
एसटी बस झाडावर आदळल्याने मोठा अपघात; "इतके" जण जखमी
img
Dipali Ghadwaje
अपघाताच्या घटना थांबता थांबत नाहीये अशातच देवळा शहरानजीक असलेल्या सप्तश्रृंगीनगर जवळ कळवण -मालेगाव ही बस (एमएच०७ सी ९१०८) गुरुवार (ता.४) रोजी सायंकाळी झाडावर आदळल्याने मोठा अपघात झाला. यामध्ये चालक-वाहकासह बसमधील जवळपास १६ प्रवाशी जखमी झाल्याने त्यांना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बसमध्ये काही बिघाड झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्यातून हा अपघात झाला. टायर फुटल्यामुळे बस झाडावर आदळली. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी कळवण, नाशिक, मालेगाव, चांदवड या ठिकाणी हलविण्यात आले आहे.  कळवण डेपोची कळवण-मालेगाव बस गुरुवार (ता.४) रोजी देवळा शहरात प्रवेश करण्यापूर्वी सप्तश्रृंगीनगराजवळ वेगाने येत असताना पहिल्यांदा उजव्या साईडच्या विजेच्या खांबाला धडक देत व त्यांनतर डाव्या बाजूच्या चिंचेच्या झाडावर धडकली.

सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. बसची पुढच्या बाजूचा चक्काचूर झाला असून बसचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यावेळेस या बसच्या मागेपुढे कोणतेही वाहन नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान जखमींना बसमधून बाहेर काढत दवाखान्यात नेण्यासाठी संभादादा मित्रमंडळ, शिवराजे मित्र मंडळ यांच्यासह इतरांनीही तातडीची मदत करण्याचे सहकार्य केले. याशिवाय येथील देवळा तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचीही मोलाची मदत मिळाली.

या घटनेबाबत देवळा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group