जालना शहरातील एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. क्रीडा प्रबोधिनीमध्ये क्रीडा शिक्षणाच्या नावाखाली येथील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना मिळाली होती. या गोपनीय माहितीनंतर, शिक्षण विभागाने या प्रकरणाची शनिवारी चौकशी केली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी स्वतः पीडित मुलींची चौकशी केली.
या सखोल चौकशीनंतर, गट शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून क्रीडा शिक्षक आणि प्रबोधिनी व्यवस्थापक प्रमोद खरात याच्या विरोधात विनयभंग आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रीडा प्रबोधिनीत क्रीडा शिक्षण घेणाऱ्या चार अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा आरोप क्रीडा शिक्षक तथा व्यवस्थापक प्रमोद खरात याच्यावर ठेवण्यात आला आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी प्रमोद खरातला बेड्या ठोकल्या.