पुण्यातील रेव्ह पार्टीवर 27 जुलै रोजी पोलिसांनी छापा टाकला होता. या कारवाईत एकनाथ खडसे यांचा जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याचदरम्यान, आज एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणावर विविध मुद्यांवर भाष्य केले.
एकनाथ खडसे म्हणाले की, माझी पत्रकार परिषद सुरु असताना साध्या वेषातील पोलीस आले. माझ्या घराच्या बाहेर आत्ताही पोलीस आहेत. माझ्या छातीवर बसण्याचा प्रयत्न करतायेत. माझा सरकारला सवाल आहे की, माझ्यावर पाळत का ठेवली जात आहे? माझा आरोप आहे की रेव्ह पार्टी हे ठरवून केलेलं षडयंत्र आहे, माझ्यावर पाळत ठेवण्याचं कारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केलं आहे. खडसेंच्या घराबाहेर पाच ते सहा पोलीस साध्या वेशात आढळून आले होते. याचा व्हिडिओ रोहिणी खडसे यांनी शूट केला आहे. त्यानंतर खडसेंनी पत्रकार परिषदेत हा व्हिडिओही दाखविला.
पोलिसांनी जिथं कारवाई केली त्याचे व्हिज्युअर्स बाहेर कसे आले? बदनामी करण्यासाठी पोलिसांनी अशा प्रकारचं कृत्य केलं आहे. या प्रकरणात डॉ. प्रांजल खेवलकरांना पहिल्या क्रमांकाचा आरोपी करण्याचे कारण काय? त्यांच्यावर एकही गुन्हा नाही. वैद्यकीय क्षेत्रातील नावाजलेलं नाव आहे. अमली पदार्थांचा साठा महिलेच्या पर्समध्ये सापडला. तिलाही माहीत नाही असं ती म्हणते. तिला पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला हवं होतं. यांना साक्षीदार करणं अपेक्षित होतं.
मात्र असं न करता एकनाथ खडसेंच्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी खेवलकरांवर आरोप केले जात आहे. प्रांजल खेवलकर आणि त्यांच्यासोबतच्या एक व्यक्तीने अल्कोहोल घेतल्याचं रिपोर्टमध्ये आलं आहे. मात्र ड्रगचा रिपोर्ट का नाही आला? ड्रग्सच्या रिपोर्टबाबत छेडखानी करण्याचा संशय खडसेंनी व्यक्त केला.