तीस वर्षांहून अधिक काळ भाजपात राहून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे आता पुन्हा भाजपात परतणार असल्याचे वृत्त एका वृत्त वाहिनीने दिले आहे. एकनाथ खडसे हे देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. पक्ष सोडण्याचा संपूर्ण ठपका देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठेवून त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती. परंतु, आता ते पुन्हा भाजपात सामिल होण्याच्या चर्चांना वेग आला आहे.
भारतीय जनता पक्षाशी ३० हून अधिक वर्षे एकनिष्ठ राहिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी २३ ऑक्टोबर २०२० रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पक्षांतर्गत वाद, भोसरी भूखंड घोटाळा, देवेंद्र फडणवीसांशी मतभेद आदी विविध मुद्द्यांवरून त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती.
२०२० मध्ये राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांना तत्काळ नेतेपदी विराजमान करण्यात आलं. तेव्हापासूनच त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली. बुथवर जाऊन कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या होत्या.
दरम्यान, गेल्या दोन वर्षांत राज्यात अनेक राजकीय उलथापालथ झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्याने राजकीय गणिते बदलली. त्यामुळे उमेदवारीचा मोठा पेच निर्माण झाला आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे. तर, महाविकास आघाडीत रावेरची जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या जागेवरून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. एकनाथ खडसेंनाच या जागेवरून उमेदवारी मिळाल्यास सून-सासरे असा जंगी सामना रंगण्याची शक्यता होती. परंतु, या जागेवरून तीन ते चार उमेदवार इच्छुक असल्याचं एकनाथ खडसेंनीच स्पष्ट केलं होतं.
दरम्यान, या काळात एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपात सामील होण्याच्या चर्चांना जोर धरला. एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, एकनाथ खडसे भाजपात जाणार असल्याचं निश्चित झालं आहे. एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातून सूनेविरोधात लढण्यास नकार दिल्यानंतर ते पुन्हा भाजपात परतणार असल्याचं स्पष्ट झालं आहे, असं या वृत्तात म्हटलं आहे.