जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही भाजपात परतणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. याच मुद्द्यावरुन भाजप नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना डिवचलं आहे. पण तरीही त्यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
“ज्या पक्षाने आपल्याला आमदार केलं. त्याच पक्षाला विश्वासात घेऊन दुसऱ्या पक्षात जाईल, असं त्यांचं म्हणणं योग्य आहे का? हे तर काहीही झालं. चांगलं आहे. भेटीगाठी होत असतात. तुम्ही कुठेही राष्ट्रीय स्वयंसेवक नव्हता किंवा भाजप पक्ष संघटन वाढीसाठी काम करत नव्हता. तुम्ही पहिल्यांदा पक्षात आले आणि पक्षाने तुम्हाला आमदार केलं. पक्षामुळे तुम्ही सहा टर्म आमदार झाला. पंधरा वर्ष लाल दिव्याची गाडी दिली. आणखी काय दिलं पाहिजे पक्षाने तुम्हाला?
जर तुम्हाला सगळे ओळखतात, तुमचे मोदी, शाह आणि जे. पी. नड्डा यांच्याशी चांगले संबंध आहेत. तर एवढे वाईट दिवस त्यांच्यावर का आले? माझा हा सुद्धा प्रश्न आहे”, असं गिरीश महाजन म्हणाले.
“पक्षश्रेष्ठी आम्हाला त्यांच्याबद्दल काही विचारलं तर आम्ही सांगू. पण ते म्हणतायेत आमची डायरेक्ट हॉटलाईन आहे. तर मला कोण विचारणार? प्रवेश झाला असता तर ते एवढे मोठे नेते आहेत राज्याच्या सर्वांना कळालं असतं ना. त्यांच्याविषय पक्षाचं जे मत असेल तेच माझं मत असेल. मी पक्षाच्या काही विरोधात नाही. पक्षाच ठरवत असेल तर विरोध करण्याच काही कारण नाही. मी तर जुना कार्यकर्ता आहे पक्षाने जर ठरवलं तर ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण नाही”, अशी भूमिका गिरीश महाजन यांनी मांडली.