महसूल विभागात खळबळ ! २५ कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी ३१ सरकारी बाबुंना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
महसूल विभागात खळबळ ! २५ कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी ३१ सरकारी बाबुंना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
img
वैष्णवी सांगळे
नैसर्गिक आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार जालना जिल्ह्यातून समोर आला आहे. या प्रकरणात चक्क सरकारी बाबूंनी 'शेतकरी' बनून तिजोरीवर डल्ला मारला आहे.अतिवृष्टी अनुदानाच्या नावाखाली तब्बल 24 कोटी 90 लाख 77 हजार 811 रुपयांचा डल्ला मारणार्‍या सरकारी बाबूंना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींमध्ये 22 तलाठी, 5 महसूल अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कर्मचार्‍याचा समावेश आहे. 

अतिवृष्टीमुळे जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले मोठे नुकसान पाहता सरकारने अनुदान जाहीर केले. मात्र सरकारने जाहीर केलेले अनुदान गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याऐवजी, येथील भ्रष्ट आणि हपापलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमताने एक कट रचला.

बनावट नावे आणि नोंदी करून ज्यांच्या नावावर एक गुंठाही जमीन नाही, अशा व्यक्तींची नावे लाभार्थी यादीत टाकण्यात आली धक्कादायक म्हणजे तहसीलदारांचे 'लॉगिन' आणि 'पासवर्ड' चोरून प्रणालीमध्ये फेरफार करण्यात आले. घोटाळा उघड होऊ नये म्हणून कागदोपत्री आणि डिजिटल पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाला.

जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीने या घोटाळ्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच आरोपींनी मोबाईल बंद करून आणि सोशल मीडियापासून लांब राहत भूमिगत होण्याचा प्रयत्न केला. मात्र, आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेत ३१ आरोपींना बेड्या ठोकल्या.आरोपींनी अटक टाळण्यासाठी आधी जिल्हा सत्र न्यायालय आणि नंतर उच्च न्यायालयाच्या छत्रपति संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली होती. मात्र, तपास अधिकाऱ्यांनी मांडलेले ठोस पुरावे आणि घोटाळ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने सर्व जामीन अर्ज फेटाळून लावले.

या घोटाळ्यात आतापर्यंत 35 जणांचा सहभाग निष्पन्न झाला असून, त्यापैकी 31 जण कोठडीत आहेत. उर्वरित 4 फरार आरोपींचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे, घोटाळ्याची रक्कम वसूल करण्यासाठी प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आरोपींच्या बँक खात्यांवर टाच आणली आहे. काही आरोपींच्या मालमत्तेवर बोजा चढवण्यात आला आहे. डिजिटल पुराव्यांसाठी मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केले आहेत.

नेमके कोण आहेत आरोपी?
तलाठी: 22
तहसील कर्मचारी: 5
जिल्हाधिकारी कार्यालय कर्मचारी: 1
संगणक ऑपरेटर आणि नेटवर्क इंजिनिअर्सचाही समावेश
Jalna |
इतर बातम्या
Join Whatsapp Group