सिटी लिंक वाहकांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरूच
सिटी लिंक वाहकांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरूच
img
सुधीर कुलकर्णी
नाशिक (प्रतिनिधी) :- आश्वासन देऊनही खात्यात वेतन जमा न झाल्याने सिटी लिंकच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेले काम बंद आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही कायम होते. दरम्यान, तपोवन डेपो येथील सुमारे 150 पैकी एकही बस आज डेपोतून बाहेर गेली नाही. कर्मचाऱ्यांनी तपोवन डेपोमध्ये आंदोलन सुरूच ठेवले असून, घोषणा देत वेतन त्वरित मिळण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, काल (दि. 14) काम बंद आंदोलन करण्यापूर्वी 35 महिलांनी कर्मचाऱ्यांनी त्यांना वेळेत वेतन दिले गेल्याने संपात न उतरण्याचा निर्णय घेतला होता. कालच्या दिवसभराच्या कामकाजानंतर मात्र त्या आज कामावर रुजू न झाल्याचे समजते.

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहरासाठी सिटीलिंकच्या बसेस सुरू केल्यानंतर आजपर्यंत विविध कारणांनी सिटी लिंकच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल आठ वेळेला आंदोलन करीत काम बंदची भूमिका घेतली. कालपासून अचानक सुरू झालेल्या या सिटीलिंक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे सुमारे अडीच हजार फेऱ्या रद्द झाल्या असून, काल 1500 कर्मचारी आंदोलनात सहभागी होते, तर आज यामध्ये कर्मचाऱ्यांची आणखी भर पडली.

डिसेंबरपासून सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त करीत अनेक वेळा काम बंद आंदोलन केले. यासंदर्भात दि. 1 मार्च रोजी झालेल्या बैठकीत यापुढे सात तारखेलाच प्रत्येक कर्मचाऱ्याच्या खात्यात पैसे जमा होतील, असे आश्वासन ठेकेदारांनी दिले होते; मात्र प्रत्यक्षात पैसे बँक खात्यात जमा न झाल्याने व महापालिकेने ठेकेदाराला आगाऊ पैसे देऊनही ते कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचले नसल्याने सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.


विद्यार्थ्यांची गैरसोय केली दूर
सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंदोलन केल्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या सुमारे 180 हून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सिटीलिंकच्या तपोवन येथील डेपोमध्ये जाऊन तेथील अधिकाऱ्यांशी वाद घातला. आमची परीक्षा आहे, वेळ होतोय आणि पास काढूनदेखील आम्हाला परीक्षेला जाणे शक्य होत नसल्याने एक तर जाण्याची व्यवस्था करून द्या किंवा आमचे पैसे द्या, अशी मागणी केली. त्यामुळे त्रस्त झालेल्या सिटीलिंकच्या अधिकाऱ्यांनी पिंपळगाव बसवंतकडे जाणाऱ्या सिटीलिंकच्या बसेस थांबवून  या सर्व विद्यार्थ्यांची त्यांच्या महाविद्यालयात व शाळेत जाण्याची व्यवस्था केली.


इतर बातम्या
Join Whatsapp Group