रस्ते अपघाताच्या घटना थांबता थांबत नाहीयेत. ब्रेकफेलसह अन्य विविध कारणांनी सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत आहेत. दोन दिवसापूर्वी याच महामार्गावरून मुंबईला जाताना नाशिकचे जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांच्या वाहनाला अपघात झाला होता. ही घटना ताजी असतानाच धुळ्यातही अपघाताची मोठी घटना घडलीये. पुण्याहून गोरखपूरकडे जात असलेल्या लक्झरी बसचा अपघात झाला आहे. या अपघातात १८ ते २० प्रवासी जखमी झालेत.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अपघातात लहान मुलांचा देखील समावेश. काही लहान मुलंही जखमी झाली आहेत. प्रवाशांनी भरलेली बस रस्त्याने जात असताना समोरील वाहनाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे लक्झरी बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि लक्झरी बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. अपघातानंतर जखमी प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे मुंबई आग्रा महामार्गावर हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी बचाव कार्य करत अपघातग्रस्तांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्यांपैकी पाच प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळालीये.