"या" भागात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली बस , नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मिळालं गिफ्ट , गावकरी आनंदी
img
Dipali Ghadwaje
गडचिरोली : स्वातंत्र्याच्या साडेसात दशकांनंतर गडचिरोलीतील गर्देवाडा ते वांगेतुरी मार्गावरील जवळपास 15 गावांना पहिल्यांदाच बससेवा मिळाली आहे. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या बससेवेचे उद्घाटन झाले असून उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः एसटी बसमधून गावकऱ्यांसोबत प्रवास केला.

 दरम्यान माओवाद्यांच्या बालेकिल्लातच मुख्यमंत्र्यांनी खास एसटी प्रवास करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. या बससेवेनंतर गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्‍यांचे आभार मानले असून आनंदही व्यक्त केला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात काही महिन्यांपूर्वीपर्यंत फक्त गर्देवाडा पर्यंतच बस जायची. कारण, यापुढे छत्तीसगड सीमेच्या दिशेने अनेक किलोमीटरपर्यंत महाराष्ट्राच्या भागात पक्के रस्ते आणि पुलच नव्हते. या भागात माओवाद्यांची हुकूमत चालत होती, दोन वर्षांपूर्वी गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या या भागात आपला डॉमिनन्स वाढवण सुरू केलं. एका नंतर एक पोलीस मदत केंद्रांची उभारणी झाली. सार्वजनिक बांधकाम विभागानेही हिम्मत करत गट्टा ते वांगेतुरी दरम्यान 32 किलोमीटरचा रस्ता निर्माण केला.

विशेष म्हणजे शासन व प्रशासकीय पातळीवर झालेल्या या प्रयोगाचे फलित म्हणजे स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतर इथं लालपरी धावली आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आज गर्देवाडाच्या पुढे महाराष्ट्र छत्तीसगड सीमेपर्यंत म्हणजेच वांगेतुरीपर्यंत बससेवा सुरू झाल्याने येथील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बस सेवेला हिरवा झेंडा दाखवला, तसेच स्वतः या बस मध्ये काही अंतरापर्यंत प्रवास केलं.

यावेळी, बसमधील बाजुच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांसोबत संवादही साधल्याचं पाहायला मिळालं. येथील परिसरातील नागरिकांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या बस सेवेच्या गिफ्टमुळे मोठा आनंद व्यक्त केला आहे. तसेच, ही बससेवा आम्हाला आरोग्य, शिक्षण आणि इतर शासकीय व प्रशासकीय कामासाठी अत्यंत उपयोगाची ठरेल, अशी प्रतिक्रिया देखील व्यक्त केली आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group