नाशिकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नाशिकच्या सिटीलिंक बसच्या चालकांनी वेतन वाढीसाठी संप पुकारल्याने काही काळ सिटीलिंक बससेवा बंद होती , मात्र आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची आणि ठेकदार यांच्यात बैठक होऊन सकारात्मक चर्चा झाली.
या बैठकीत चालकांच्या बऱ्यापैकी मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यानंतर नाशिकरोड आणि तपोवन या दोन्ही डेपोमधील सिटीलिंक बस सेवा पूर्ववत सुरू झाली. गेल्या तीन दिवसांपासून एकही बस बाहेर दैनंदिन मार्गावर न धावल्याने शालेय विद्यार्थी, नोकरदार तसेच प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली होती.
त्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात होता. शनिवारपासून मनसेना कामगार सेनेतर्फे हा संप पुकारण्यात आला होता. अखेर आज या संपावर तोडगा निघाल्याने उद्यापासून सिटीलिंकच्या बस नेहमीच्या मार्गावर धावतांना दिसणार आहेत. त्यामुळे नाशिककरांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.