मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज जालन्यात सकल मराठा समाज आणि मराठा संघटनांकडून जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला. या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय, मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील, दीपक केदार यांच्यासह समाज बांधव सहभागी झाले होते. परंतु या मोर्चात मनोज जरांगे यांचे भाषण झाले नाही.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खराब आहे. त्यामुळे त्यांनी मोर्चाच्या आयोजकाना मी बोलणार नाही. माझी तब्येत खालावली आहे, असे सांगितले होते. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांना उपचारासाठी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार आज जालन्यात मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा होता. या मोर्च्यात मनोज जरांगे पाटील हे तब्येत खराब असतानाही चालले. त्यांना थकवा जाणवत असल्याने त्यांनी भाषण दिले नाही. यानंतर आता त्यांना उपचारासाठी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर प्रदीप चावरे यांनी सांगितले की , मनोज जरांगे पाटील रक्तदाब कमी आहे. बॅक पेन जास्त आहे त्यामुळे त्यांचे सिटी स्कॅन करण्यात येणार आहे. आता रिपोर्ट आल्यावर त्यांच्यावर पुढील रिपोर्ट आल्यावर उपचार केले जाणार आहेत.
सध्या मनोज जरांगे पाटील यांची कंबर दुखत आहे. त्यांना पायऱ्या चढायला उतरायला त्रास होत आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असले तरी त्यांनी उद्या धाराशिवमध्ये मोर्चाला जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे म्हटले आहे.