मराठा आरक्षणासाठी ५ दिवस मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर आंदोलन झाले. यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले. दरम्यान राज्य शासनाने मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातील आंदोलनाची सांगता झाली. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी मराठा बांधवांकडून जल्लोष करण्यात आला. मात्र, आता या शासन निर्णयावरुन ओबीसी समाज आक्रमक झाला असून अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनीही हा शासन आदेश संविधानाला धरुन नसल्याचे म्हटले.
काय म्हणाले अॅड. गुणरत्न सदावर्ते ?
उपाशी ठेवायाचे आणि स्वयंपाक करायला लावतो म्हणायचे, हे असं झालय. जात जाता जात नाही असा हा प्रकार आहे. एकदा आरक्षण दिले, तरी पुन्हा आरक्षण दिले हे कोणत्या आधारे? मग 10 टक्के आरक्षण रद्द करणार आहात का? त्याची विनंती मी 13 तारखेला न्यायालयात करणार आहे.
आमदार-खासदार मराठा समाजाचे आहेत, मराठवाड्यातले आहेत, ते चॉकलेट वाटण्यासारखे प्रमाणपत्र देतील. पण, मराठा बांधव मागासलेले नाहीत, वडारी दगड फोडतो, त्याला मागासलेपण म्हणतात. मंदिरातल्या चाव्या ब्राह्मणांकडे नाही तर मराठ्यांकडे आहेत,असेही सदावर्तेंनी म्हटलं. दरम्यान, जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे, मुंबईत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे, ते त्यांच्या खिशातून भरून द्यावे, अशीही मागणी सदावर्ते यांनी केली आहे.